जळगाव मिरर | ९ डिसेंबर २०२४
राज्यात प्रतिबंधित असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या जळगावातील जोशीपेठेतील दोघांवर तर भुसावळातील एकावर एलसीबीच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत ८ हजार रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी शनिपेठ व भुसावळ बाजारपेठेत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासनाने प्रतिबंधित केलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सफौ रवी नरवाडे, अतुल वंजारी, गोपा गव्हाळे, सचिन पोळ, प्रदीप सपकाळे, प्रदीप चवरे यांचे पथक तयार कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने शनिवारी शहरातील जोशीपेठ परिसरातील पतंग गल्लीत जावून पाहणी केली. यावेळी कुणाल नंदकिशोर साखला (वय ३२) व किरण भगवान राठोड (वय ५८) हे त्यांच्या घरासमोर व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात आणणारा नायलॉन मांजा विक्री करतांना आढळून आले. त्यांच्यावर छापा टाकून एलसीबीच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत कुणाल साखला याच्याकडून ९ हजार ५० रुपयांचा तर किरण राठोड ४ हजार ८०० रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हादाखल करण्यात आला आहे.
तिसरी कारवाई ही भुसावळातील भजेगल्लतील सराफ बाजारात करण्यात आली. याठिकाणी नितीन गोपाळ पतकी हा नायलॉन मांजा विक्री करतांना मिळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून ६ नायलॉन मांजाची चक्री जप्त केली असून त्याच्याविरुद्ध देखील बाजारपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात शासनाने नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यावर बंदी घातली आहे. तरी देखील पतंग विक्रेत्यांकडून या मांजाची सर्रासपणे विक्री केली जाते. या मांजामुळे अनेकांना गंभीर दुखापत झाली असून काहींना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. त्यामुळे मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम सुरु राहणार असून विक्री करणाऱ्यासह खरेदी करणाऱ्यांवर आता कारवाई केली जाणार आहे.