जळगाव मिरर | ९ डिसेंबर २०२४
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून लाच घेण्याचे प्रमाण वाढत असताना नुकतेच जळगाव शहर मनपातील अधिकाऱ्याने देखील १५ हजाराची लाच घेताना जळगाव एसीबीने अटक केली आहे. बांधकामाच्या परवानगीचे व बांधकाम झालेल्या घराचे भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी तडजोडीअंती 15 हजारांची लाच स्वीकारताना जळगाव महापालिकेतील नगर रचना सहाय्यक मनोज समाधान वन्नेरे (34) यास जळगाव एसीबीने सोमवार, 9 रोजी सायंकाळी अटक केल्याने लाचखोरांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या कारवाईने जळगाव महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह सहा संचालक तायडे यांच्यादेखील अडचणी वाढल्या असून त्यांच्या नावानेही लाच मागण्यात आल्याने त्यांना सोमवारी सायंकाळी एसीबीने चौकशीसाठी बोलावल्याचे सूत्रांनी सांगितले.
जळगाव तालुक्यातील खेडी बु.॥ गावातील 34 वर्षीय तक्रारदार यांनी बांधकामाच्या परवानगीचे व बांधकाम झालेल्या घराचे भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे प्रकरण मंजूर करण्यासाठी परवानगीसाठी नगर रचना विभागात तीन प्रकरणे दाखल केली आहेत. त्यात पहिल्या प्रकरणात 21 व तडजोड अंती 15 हजार व दुसर्या प्रकरणात 15 हजारांची लाच जळगाव मनपा आयुक्त, व मनपाचे सहाय्यक संचालक (अतिरिक्त कार्यभार) यांच्यासाठी 30 हजारांची लाच मागून पहिल्या प्रकरणात 15 हजार रुपये स्वीकारण्याची तयारी सोमवारी दर्शवल्यानंतर एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. लाच स्वीकारताच वन्नेरे यांना अटक करण्यात आली.
यांनी केली कारवाई
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, किशोर महाजन, राकेश दुसाणे आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.