जळगाव मिरर | २७ नोव्हेबर २०२४
भुसावळ शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील कापड दुकानाला भीषण आग लागल्याची घटना २५ नोव्हेंबर रोजी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. यात जवळपास २५ लाख २० हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याप्रकरणी दुपारी २ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील सिंधी कॉलनीत राकेश महेशलाल कुकरेजा (वय ३०) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. त्यांचे सिंधी कॉलनी परिसरात श्री आनंद ड्रेस मटेरियल नावाचे कापडाचे दुकान आहे. हेच कापड दुकान चालवून ते आपल्यासह आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवतात.
दरम्यान, २५ नोव्हेंबर रोजी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्या कापड दुकानाला भीषण आग लागली. या आगीत सुमारे २५ लाख २० हजार रूपयांचा मुद्देमाल जळून खाक झाल्याचा अंदाज त्यांच्याकडून वर्तवण्यात आला आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ प्रशांत देशमुख करत आहेत.