जळगाव मिरर | ७ डिसेंबर २०२४
महाराष्ट्र शासन कृषि विभाग, आत्मा जळगाव व कृषि विज्ञान केंद्र, ममुराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मृदा दिनानिमित्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस जागतिक मृदा दिनाची शपथ घेण्यात आली व पुढे मार्गदर्शन करताना जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. कुर्बान तडवी यांनी मातीच्या आरोग्याचे भविष्यातील पिढीच्या दृष्टीने महत्त्व याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून शेतातील माती वाहून न जाता शेतात कशा पद्धतीने संवर्धित करता येईल याबाबत उपाययोजना बाबत मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांनी आपले शेतात बांध-बंधिस्ती करून बांधावर फळझाड अथवा बांबू,शेवगा इ. झाडांची लागवड केल्यास शेतकऱ्यांना बांधावरून देखील उत्पन्न मिळू शकते अशी माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. हेमंत बाहेती यांनी माती परीक्षणाची उपयुक्तता व मातीच्या माध्यमातून पसरणारे रोग व त्यांची घ्यावयाची काळजी याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी श्रीमती. हर्षदा देसले यांनी माती नमुने काढण्याची पद्धत, माती नमुने काढताना घ्यावयाची काळजी, व माती नमुना चे प्रकार याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली तसेच कृषिक ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून शेतकऱ्यांनी याद्वारे हवामानाचा अंदाज खतांच्या मात्रा याबाबत माहिती घेऊन आपल्या शेतात वापर करण्याबाबत आव्हान केले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी श्रीमती. स्नेहल थेऊरकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आपल्या प्रक्षेत्राची माती परीक्षण करूनच खतांच्या मात्रा वापरण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमावेळी कृषी विज्ञान केंद्र शास्त्रज्ञ शरद जाधव, वैभव सूर्यवंशी, किरण जाधव, किरण मांडवळे, तुषार गोरे कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी अमित भामरे, मिलिंद वाल्हे, कृषी सहाय्यक व शेतकरी उपस्थित होते. सदरील कार्यक्रमा वेळी सूत्रसंचालन मंडळ कृषि अधिकारी श्री. अमित भामरे यांनी केले.