जळगाव मिरर | १३ डिसेंबर २०२४
मेडकीलच्या दुकानावर धिंगाणा घालणाऱ्यांना हटकल्याचा राग आल्याने तिघांनी भावेश रविंद्र मराठे (वय २१, रा. जाकीर हुसेन कॉलनी) या तरुणाच्या डोक्यात लोखंडी वस्तू मारुन गंभीर जखमी केले. ही घटना दि. १० रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास जानता राजा व्यायाम शाळेसमोर घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जाकीर हुसेन कॉलनीत भावेश मराठे हा तरुण वास्तव्यास असून तो मेडीकलवर पार्टटाईम जॉब करतो. दि. १० रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास कल्पेश पाटील हा तरुण तेथे आला, त्याच्यासोबत इतर दोन त्याठिकाणी आले. त्यांच्यामध्ये वाद होवून ते धिंगाणा घालीत असतांना भावेश मराठे याने त्यांना हटकले. त्याचा राग आल्याने कल्पेश पाटील याने भावेशला वाघ नगर स्टॉपजवळ बोलविले. परंतु त्याने जाण्यास नकार दिल्याने त्यांनी भावेशला काव्यरत्नावली चौकात बोलविले. त्याठिकाणी येताच, कल्पेश पाटील याच्यासह त्याच्यासोबत असलेल्यांनी तू आम्हाला मेडीकलवर बोललाच का असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्यातील एकाने लोखंडी वस्तू भावेशच्या डोक्यावर मारुन त्याला गंभीर जखमी केले. दरम्यान, मागून येत असलेल्या भावेशच्या मित्राने त्याला तिघांच्या तावडीतून सोडवून तात्काळ रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी भावेशने दिलेल्या तक्रारीवरुन संशयित कल्पेश पाटीलसह दोघांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
