जळगाव मिरर | १६ फेब्रुवारी २०२५
जगभरातील अनेक भाविक कुंभ मेळ्यासाठी जात असतांना नवी दिल्ली रेल्वे स्थानकात कुंभ मेळ्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांची शनिवारी गर्दी झाली होती. यामुळे चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना घडली. रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 16 वर झालेल्या चेंगराचेंगरीत 3 मुलांसह 18 जणांचा मृत्यू झाला. तसेच या घटनेत अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. याशिवाय 10 लोक गंभीर जखमी झाले आहेत.
शनिवारी रात्री (15 फेबुवारी) रात्री 8 वाजता प्रयागराजला जाण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर नवी दिल्ली रेल्वे स्थानकात आले. यामुळे हा गोंधळ उडाला. यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीनंतर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना शांत राहण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, गाड्या का लेट झाल्या आणि पुरेशी व्यवस्था करण्यात आली होती की नाही? या संपूर्ण घटनेची चौकशी रेल्वे अधिकारी करत आहेत.
दिल्ली पोलिसांनी एक निवेदन जारी केले की, जेव्हा प्रयागराज एक्सप्रेस प्लॅटफॉर्म 14 वर उभे होते, तेव्हा प्लेटफॉर्मवर बरीच गर्दी होती. स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर राजधानी उशीरा होते आणि या गाड्यांचे प्रवासी देखील प्लॅटफॉर्म क्रमांक 12,13 आणि 14 येथे उपस्थित होते. सीएमआयनुसार रेल्वेने दर तासाला 1500 सामान्य तिकिटे विकली, म्हणून गर्दी अनियंत्रित झाली. प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 16 जवळ एस्केलेटरजवळ चेंगराचेंगरी झाली.
दिल्लीच्या कार्यवाहक मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या की, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या अपघातात महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांचा दुर्दैवी मृत्यू अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. आम्ही एलएनजेपी रुग्णालयात पोहोचलो आणि घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांना भेटलो. अनेक लोक जखमीही झाले आहेत, ज्यांवर उपचार सुरू आहेत. आमचे दोन आमदार पीडित कुटुंबांना मदत करण्यासाठी रुग्णालयात उपस्थित आहेत, असं आतिशी म्हणाल्या.