
जळगाव मिरर | ८ एप्रिल २०२५
चाळीसगाव तालुक्यातील आडगाव येथे मुलाच्या विवाहाची घरात तयारी सुरू असतानाच बापाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना देवळी येथे घडली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त असे कि, देवळी येथील हॉटेल व्यावसायिक दगा तुकाराम पाटील (५३) यांचा पत्नी, दोन विवाहित मुली, मुलगा असा परिवार. मुलीचे सासरी चांगले आहे, त्यामुळे बिनधास्त असणाऱ्या त्यांना एकुलता एक मुलगा गणेश याची काळजी होती. योगायोगाने गणेशचेदेखील तितूरगाव (ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील एका गरीब कुटुंबातील मुलीशी योग जुळून आला. ३ तारखेला मुलीकडे छोटेखानी साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला. ६ मे ही तारीखदेखील विवाहासाठी निश्चित करण्यात आली. अवघ्या एका महिन्यावर लग्न आले म्हणून मंडप, बँडवाले, आचारी, बग्गी या सर्वांना बेणे दिले गेले. आता पत्रिका वाटप करणे व मूळ लावणे हे एक-दोन दिवसात सुरू करू, अशा विचारात ते होते.
लग्नाची तयारी करताना पहिली वन्हाडीण म्हणून त्यांनी एका मुलीला निमंत्रण दिले. मुलीची मुलगी म्हणजे नातीच्या हाताला दुखापत झाल्याने तिला चाळीसगाव येथिल डॉक्टराकडून उपचार केल्यानंतर सायंकाळी आपल्या देवळी या गावी सोडले. थोडावेळ थांबून हॉटेलात काय काय बाजार लागणार आहे, त्याची यादी केली व पुन्हा रात्री ८ वाजेच्यादरम्यान चाळीसगावकडे निघाले. तत्पूर्वी गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी आपली दुचाकी पंपाकडे वळवली तोच समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाचा अंदाज न आल्याने गाडी व दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला. अपघातात दगा पाटील यांचे वाहन गाडीच्या मागच्या टायरखाली आल्याने त्यांच्या मेंदूला तसेच एका हाताला व एका पायाला जबरदस्त मार लागला. त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता शवविच्छेदन झाल्यानंतर ११ वाजता गावांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मेहुणबारे पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.




















