जळगाव मिरर | ९ एप्रिल २०२५
राज्यातील पुणे शहर गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारीचे ठिकाण होत असतांना आता एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी कार्यकर्ता शंतनु कुकडे याला लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक केल्यानंतर पोलिस तपासात कुकडे याने त्याच्या अन्य साथीदारांसह भूतान येथून आलेल्या अजून एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी वकिलांसह सहा जणांना अटक केली आहे. ऋषिकेश नवले (वय 48), प्रतीकशिंदे (वय 36), विपीन बीडकर (वय 48), सागर रासगे (वय 35), अविनाश सूर्यवंशी (वय 58) आणि मुद्दसीर मेमन (वय 38) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
आरोपींना अटक करून मंगळवारी (दि. 8) न्यायालयात हजर करण्यात आले. सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करताना सरकारी वकील नीलिमा इथापे-यादव म्हणाल्या की, पीडित महिला भूतान देशाच्या नागरिक असून, त्या नोकरीच्या शोधात पुण्यात आल्या होत्या. त्या निराधार आणि असहाय्य्य असताना आरोपींनी त्यांचा गैरफायदा घेऊन जबरदस्तीने त्यांच्या इच्छेविरुद्ध शरीसंबंध ठेवले.
पीडितेने आरोपींच्या नावानिशी तक्रार दिली आहे. आरोपी हे एकमेकांचे मित्र असून, त्यांना गुन्हा करण्यास कुणी प्रवृत्त केले, तसेच दाखल गुन्ह्यात त्यांचे इतर कुणी साथीदार आहेत का, याचा तपास करायचा आहे. गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपींची वैद्यकीय चाचणी करायची आहे, त्यामुळे आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी अॅड. इथापे-यादव यांनी केली. न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली.