
जळगाव मिरर | ११ एप्रिल २०२५
जळगाव जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढत आहे तर अनेक ठिकाणी आगीच्या देखील घटना घडत असतांना नुकतेच चाळीसगाव शहरातील नागद रोडवरील मिरची बाजारात आज दुपारी लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली. आगीचे प्रचंड लोळ आणि धुराचे लोट दूरवरून स्पष्टपणे दिसत होते, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे या बाजाराजवळच पेट्रोल पंप असल्याने संभाव्य धोक्यामुळे घबराटीचे वातावरण पसरले.
मिळालेल्या माहितीनुसार, या आगीत बाजारात उभ्या असलेल्या काही मोटारसायकलींना आगीने ग्रासले. यामुळे मोठे स्फोट होऊन नागरिकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली. एक ट्रक देखील पूर्णतः जळून खाक झाला असून, यामुळे प्राथमिक अंदाजानुसार कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. मिरची बाजारात मोठ्या प्रमाणावर मिरची आणि इतर शेतमालाचा साठा होता. आग इतकी भयानक होती की संपूर्ण साठा जळून खाक झाला असण्याची शक्यता आहे. यामुळे व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे . घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव नगरपालिकेचे अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.




















