जळगाव मिरर | १२ एप्रिल २०२५
राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या तापमान वाढत असतांना काही ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सियसच्याही पुढे गेले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात वाढत्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहे. यातच बुलढाणा जिल्ह्यातील संस्कार सोनटक्के या विद्यार्थ्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. अकोला जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून बुलढाणा जिल्हा शल्य चिकित्सक यांना संस्कार सोनटक्के या विद्यार्थाच्या मृत्यूबाबत कळवण्यात आले होते. मात्र, संस्कारचा मृत्यू उष्माघातामुळे झाला नसल्याचं आता समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संस्कार सोनटक्के या 12 वर्षीय मुलाचा मृत्यू हा उष्माघाताने नसून विषाणूजन्य मेंदू ज्वराने झाला असल्याचं स्पष्टीकरण अकोला महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाचे डॉ. आशिष गिऱ्हे यांनी दिले आहे. दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील 12 वर्षीय संस्कार सोनटक्के या विद्यार्थ्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर बुलढाणा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी नागरिकांना काळजी घेण्याचा आवाहन केलं आहे. उन्हाच्या वेळेस घराच्या बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावं, तसंच उष्माघाताची लक्षणे व आढळल्यास तात्काळ शासकीय रुग्णालयात वैद्यकीय मदत घ्यावी, असे आवाहनही जिल्हा शल्य चिकित्सक यांनी जनतेला केले आहे.