
जळगाव मिरर | १२ एप्रिल २०२५
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना खरेतर टकमक टोकावरून लोटले पाहिजे. पण आपल्याकडे लोकशाही आहे. त्यामुळे या प्रकरणी निश्चित असे काही नियम तयार केले जाणार आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना कठोर शासन करण्याप्रकरणी एक कायदा करण्याचे संकेत दिले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अमित शहा रायगडावर केवळ केंद्रीय गृहमंत्री म्हणून आले नाहीत, तर ते छत्रपती शिवरायांचे सेवक आणि मराठा इतिहासाचे एक संशोधक म्हणून आले आहेत. रघूजी राजे आंग्रे यांनी योग्य सांगितले. ज्यावेळी संपूर्ण देशात मोगलाई, कुतूबशाही, आदिलशाही होती. त्यावेळी या देशातले राजे आणि राजवाडे भंग पावत होते. मोडकळीस येत होते. लढून संपत होते. वाटत होते परकीय आक्रमकांचे राज्य संपणार नाही. तेव्हा आई जिजाऊंच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांसारखा एक सूर्य उगवला. ते नसते तर आपण कुणीच नसतो. त्यांच्यामुळे आपण देश आणि धर्माचे काम करत आहोत, असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, आमच्या उदयन महाराज यांनी सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. त्या संदर्भात योग्य ती कारवाई करायची आहे. सरकार ती करेलच. पण महापुरुषांचा अपमान छत्रपतींचा अवमान करणाऱ्यांवर टकमक टोकावरूनच लोटले पाहिजे. पण आपल्याकडे लोकशाही असल्यामुळे या प्रकरणी काही निश्चित नियम तयार केले जातील. शिवाजी महाराजांचा प्रमाण इतिहास राज्य सरकारकडून तयार केला जाईल. हे काम सरकार आपल्या हातात घेईल, असं फडणवीस म्हणाले.
अरबी समुद्रातील स्मारक सुप्रीम कोर्टात अडकले होते. पण आता ते सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाकडे पाठवले होते. आम्ही शिवरायांचे मावळे आहोत. हार मानणार नाही. सरकार हा खटला हायकोर्टात लढून ते स्मारक मोकळे करून घेईल. कोणत्याही परिस्थितीत शिवरायांचे स्मारक झाले पाहिजे हा प्रयत्न आपला असेल, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.




















