जळगाव मिरर | १४ एप्रिल २०२५
यावल शहरातील धनगर वाड्यात म्हसोबा चौकात डांबरीकरणाचे काम सुरू होते. तेथे एका ३० वर्षीय ठेकेदाराला याच भागातील रहिवाशी एकाने तुम्ही चांगले काम करत नाही असे सांगून त्याच्याशी वाद घातला व त्यांना शिवीगाळ करून मारहाण करीत त्यांच्याकडे ५० हजार रुपयाची खंडणी मागितली. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल शहरातील धनगर वाड्यात म्हसोबा चौक आहे. या म्हसोबा चौकामध्ये भूषण राजेंद्र पाटील (वय ३०) हे ठेकेदार डांबरीकरणाचे काम करत होते. दरम्यान तेथे नरेंद्र उर्फ खन्ना गजानन माळी हा तरुण आला आणि त्याने सदर काम तुम्ही बरोबर करत नाही असे सांगून काम थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ठेकेदाराने कामा बद्दल काही तक्रार असेल तर तुम्ही नगर पालिकेकडे लेखी तक्रार द्या आमच्याशी वाद घालु नका असे सांगीतले. मात्र, सदर तरूणाने जर काम सुरू ठेवायचे असेल तर मला ५० हजार रुपये दे असे सांगत खंडणी मांगीतली. आणि वाद घालत सदर ठेकेदार व त्यांच्या कामगारांना शिवीगाळ करून मारहाण केली. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.