
जळगाव मिरर | २१ एप्रिल २०२५
महामार्गावर अपघाताच्या मालिका सुरु असतांना आता रविवारी रात्री मुंबई – पुणे महामार्गावरील खंडाळा येथील बॅटरी हिल परिसरात भरधाव ट्रकने इनोव्हा कारला दिलेल्या धडकेमुळे झालेल्या साखळी अपघातात 3 जण ठार व 14 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळा शहर पोलिस ठाण्यात सागर पांडुरंग इंगुळकर (रा. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ट्रक (क्र. जीजे 63 बीटी 6701) पुण्याकडून मुंबईच्या दिशेने रविवारी रात्री साडेदहा वाजता जात असताना त्याने इनोव्हा कार (क्र. एमएच 19 बीजी 8067) ला मागून जोरात धडक दिली. या धडकेनंतर इनोव्हा कार समोरून येणाऱ्या एर्टिगा कारवर (क्र. एमएच 12 युसी 2800) आदळली आणि अपघात अधिक भयावह झाला.
या दुर्घटनेत प्रिया सागर इंगुळकर (रा. शुक्रवार पेठ, पुणे), निलेश संजय लगड (वय 42, रा. सदाशिव पेठ, पुणे) आणि त्यांची मुलगी श्राव्या निलेश लगड (वय 12) यांचा जागीच मृत्यू झाला. एर्टिगा कारमधील शरयू, रूद्राक्ष, अषिका मोगल, आरव मोगल, अर्ष व आरसित लगड या प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून शारीरिक मुक्का मार बसले आहेत.त्याचप्रमाणे इनोव्हा कारमधील प्रवासी – अष्विनी रमेश जाडकर (वय 43), ओमकेश रमेश जाडकर (वय 22), सुमित तुकाराम कदम (वय 24), पुष्कर लक्ष्मण शेळकंदे (वय 25), जिगनेश रमेश जाडकर (वय 12), संजय नामदेव वाल्हेकर (वय 42) आणि विमल नामदेव वाल्हेकर (वय 69, सर्व रा. भिवंडी, जि. ठाणे) हेही किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड करत आहेत.






















