जळगाव मिरर | ८ ऑगस्ट २०२६
गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे राज्यातील अनेक भागांत तापमान आणि उकाड्यात वाढ झाली आहे. मात्र, आता पुन्हा हवामानात बदल होण्याची चिन्हे असून राज्याच्या काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज, शनिवार दि. ८ ऑगस्ट रोजी जळगाव, नाशिकसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार जळगाव, नाशिक, जालना, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत जोरदार वारेही वाहू शकतात. त्यामुळे नागरिकांनी हवामानाची स्थिती पाहूनच घराबाहेर पडावे तसेच वादळी पाऊस आणि विजांच्या वेळी आवश्यक खबरदारी घ्यावी.
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे वातावरणातील उष्णता वाढली असून दिवसभर जाणवणाऱ्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशातच आता पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याने काही भागांत उकाड्यापासून तात्पुरता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यलो अलर्ट असलेल्या जिल्ह्यांव्यतिरिक्त कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या उर्वरित भागांतही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. मात्र, पावसाचे प्रमाण प्रत्येक भागात सारखे राहणार नसून स्थानिक वातावरणानुसार त्यामध्ये फरक दिसून येऊ शकतो.
दरम्यान, पश्चिम बंगाल आणि बांगलादेश परिसरात वातावरणाच्या वरच्या स्तरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे पश्चिम बंगालच्या किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता आणि पुढील वाटचाल महत्त्वाची ठरणार आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील आगामी काही दिवसांतील पावसाचे प्रमाण आणि वितरण स्पष्ट होईल. त्यामुळे हवामान विभागाच्या पुढील अंदाजाकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
जळगाव जिल्ह्यालाही वादळी पावसाचा इशारा असल्याने विशेषतः शेतात काम करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांनी विजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. झाडाखाली थांबणे टाळावे. वादळी वारे आणि विजांचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी हवामान विभाग व स्थानिक प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे.





















