जळगाव मिरर | ८ ऑगस्ट २०२६
शेतात काम करताना ट्रॅक्टरसह विहिरीत पडल्याने शिंदी येथील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडळी. या घटनेप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यातील शिंदी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील शिंदी येथील परिक्षीत रावसाहेब कोकणे (वय ३५) हे गुरुवारी दुपारी आपल्या शेतात ट्रॅक्टरद्वारे पिकांना युरिया खत देत होते. दरम्यान, दुपारी ३ वाजता ट्रॅक्टर मागे घेत असताना कठडा नसलेल्या विहिरीचा अंदाज न आल्याने ट्रॅक्टरसह ते विहिरीत पडले. या घटनेची माहिती मिळताच शेतमजुरांनी घटनास्थळी धाव घेतली. तर, परिक्षीत कोकणे यांना पोहता येत नसल्याने पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.
यानंतर नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केला होता. याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हवालदार प्रवीण संगीले, अकरम बेग तपास करीत आहेत. दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे शिंदी गावावर शोककळा पसरली असून, परिक्षीत कोकणे यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.





















