मुंबई : वृत्तसंस्था
आज विधानसभेत भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारने बहुमत सिद्ध केले. भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडला. तर भारत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. बहुमत चाचणीत भाजपा-शिंदे गटाला १६४ मते मिळाली. तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली. दरम्यान, समाजवादी पार्टीचे अबू आझमी , शाह फारूख अन्वर (Farooq Anwar) यांनी तटस्थ भूमिका घेतली. यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विश्वासदर्शक ठराव शिंदे-भाजप सरकारच्या बाजूने संमत झाल्याची घोषणा केली.
यानंतर शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मात्र माध्यमांशी बोलण्यापूर्वी शिंदे गटातील आमदार प्रकाश सुर्वे अचानक समोर आले. यावेळी दोघांची भेट झाली. त्यानंतर प्रकाश सुर्वे आणि आदित्य ठाकरे यांचा विधान भवनाबाहेर संवाद झाला. माझं तुमच्यावर खूप प्रेम होतं. तुम्हालाही माहिती आहे. तुम्ही त्या दिवशी जेवण ठेवलं होतं आणि मी येतच होतो, पण असू द्या, असे आदित्य ठाकरे प्रकाश सुर्वे यांना म्हणाले. यावेळी आदित्य ठाकरे हे प्रकाश सुर्वेंशी संवाद साधताना भावुक झाल्याचे दिसून आले. दरम्यान, शिवसेना कधीही संपणार नाही. शिवसेना दुपटीपेक्षाही जास्त ताकद घेऊन विधान भवनात येईल आणि भगवा फडकवेल. तसेच राज्यात मध्यवर्ती निवडणुका लागण्याची शक्यता असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसेच २० मे रोजी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री होण्याबाबत विचारले होते, असा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला.





















