मुंबई :- काल रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट होती. त्याला ब्रेक नव्हता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता होती, की अपघात तर होणार नाही ना? काल उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर असलेला माईक आपल्याकडे खेचला. पुढे काय काय खेचतील ते माहीत नाही, असा खरमरीत टोला शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला होता. त्यावर आता मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील ४० आमदारांनी केलेल्या बंडाळीनंतर डॅमेज कंट्रोलसाठी स्वत: माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते मैदानात उतरले आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री असताना मातोश्री आणि वर्षा बाहेर न पडलेले उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकांवर भर दिला आहे. आजही शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांनी बैठकीत बोलताना रिक्षावाल्याची रिक्षा काल सुसाट सुटली होती, रिक्षाला ब्रेक लागत नव्हता, असा टोला लगावला होता.
उद्धव ठाकरे यांच्या या विधानावर आता मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘रिक्षाच्या स्पीड पुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला… कारण हे सर्वसामान्यांचे सरकार!!’ असे ट्विट करत MaharashtraFirst हा हॅशटॅग वापरत शिंदेनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या रिक्षावाला या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. काँग्रेसने पंतप्रधान मोदींना चायवाला म्हणून हिणवले होते. ज्यांनी चायवाला म्हणून हिनवले त्यांच्यावर मोदींनी पाणी पिण्याची वेळ आणली. आज त्यांच्या पक्षाची काय अवस्था आहे, हे तुम्ही बघतच आहात. आम्ही रिक्षावाले असून तर आम्हाला अभिमानच आहे. पान टपरी, चहा टपरीवाले असू किंवा रस्त्यावरील विक्रेते असू आम्हाला त्याचा अभिमान आहे. कारण या देशात तो स्वाभिमानाने जगतो. मोदींच्या काळात सामान्य माणूसच राजा होईल, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांनी हे समजून घ्यावे, अशा शब्दात फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.





















