
जळगाव मिरर | ९ जून २०२५
नातेवाईकांकडे लग्न सोहळ्यासाठी गेलेल्या ज्योती संदीप मेकलकर (वय ४५, रा. गायत्री नगर) यांच्या बंद घराचा दरवाजा तोडला. त्यानंतर घरातून चोरट्यांनी ९ हजार रुपयांच्या रोकडसह दागिने आणि चांदीचे पुजा साहित्य व लॅपटॉप चोरुन नेला. ही घटना दि. ३१ मे ते दि. ६ जून दरम्यान गायत्री नगरात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील गायत्री नगरातील ज्योती मेकलकर या वास्तव्यास आहे. त्यांच्या नातेवाईकांकडे लग्न असल्याने त्या दि. ३१ रोजी लग्नसोहळ्यासाठी गेलेल्या होत्या. त्या वेळी चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले. त्यानंतर घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातून रोख ९ हजार रुपये, सहा हजार रुपये किमतीची सोन्याची बाळी, नथ, १० हजार रुपये किमतीचे चांदीचे पैंजन, चांदीचे नाणे, कुंकवाचे दोन करंडे, १२ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप असे एकूण ३७ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. लग्नकार्य आटोपून मेकलकर कुटुंबीय घरी आले त्या वेळी ही घटना उघडकीस आली.
या प्रकरणी ज्योती मेकलकर यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार दत्तात्रय बडगुजर करीत आहेत. कपाटामध्ये मेकलकर यांनी लक्ष्मी पूजनासाठी वापरण्यात येणारे कोऱ्या नोटांचे सहा बंडल ठेवले होते. ते बंडलही चोरट्यांनी चोरुन नेले. तसेच चोरीमध्ये पूजा साहित्याचा अधिक समावेश आहे.




















