
जळगाव मिरर | ११ जून २०२५
वडील कामावर तर आई नातेवाईकांकडे गेलेली होती. त्यामुळे घरी एकटीच असलेल्या हुमेरा रहीम पटेल (वय १६, रा. रजा कॉलनी) या मुलीने घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. घराबाहेर खेळत असलेला तिचा भाऊ घरी आल्यानंतर त्याला बहिणीने गळफास घेतल्याचे दिसून आले. ही घटना मंगळवार दि. १० रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील रजा कॉलनीत रहीम पटेल हे वास्तव्यास असून ते हमाली काम करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. रहीम पटेल हे मंगळवारी नेहमीप्रमाणे कामावर गेलेले होते, दुपारच्या सुमारास त्यांची पत्नी या नातेवाईकांकडे गेलया होत्या. त्यामुळे घरी केवळ रहीम पटेल यांचे मुलेच होते. वीज नसल्याने उकाड्यामुळे मुलगा घराबाहेर खेळत होता. त्या वेळी घरात एकटीच असलेल्या मुलगी हुमेरा हिने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविले. बाहेर खेळत असलेला भाऊ घरात गेला त्या वेळी त्याला बहीण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली.
मोठी बहिण ही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसताच लहान भावाला धक्काच बसला. त्याने घटनेची माहिती शेजारच्यांना दिल्यानंतर त्यांनी मुलीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. यावेळी तिच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.




















