
जळगाव मिरर | १४ जून २०२५
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या मालिका सुरु असतांना आता भुसावळ तालुक्यातील वरणगावहून भुसावळकडे जाणाऱ्या रस्त्यावर रेणुका नगर जवळील पुलाजवळ गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.
या अपघातात आयुब खान रशीद खान (वय ६५, रा. साईपार्क, वरणगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पाठीमागे बसलेले सैयद रशीद सैयद अमीर (वय ६५, र. खडका रोड, भुसावळ) हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहीती अशी की, मोटरसायकल चालक आरोपी देवा संतोष गुमळकर (रा. वरणगाव) हा एम एच ३७ एच -९११९ क्रमांकाच्या मोटरसायकलवर लखन सुरेश बाविस्कर, यश मनोज चावरीया, रोहित मुकेशतरू शहा यांना घेऊन भरधाव वेगाने चालवत होता.
त्याने समोरून येणाऱ्या आयुब खान यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, अपघातग्रस्तांना तत्काळ वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे या प्रकरणी आरोपी देवा संतोष गुमळकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सफौ. नागेंद्र तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.




















