
जळगाव मिरर | १५ जून २०२५
अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढ होत असतांना आता छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगाव शेनपुंजी इथल्या नर्सरी कॉलनीमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खाजगी शिकवणीतल्या 45 वर्षीय शिक्षकाने चौथीतल्या विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवत लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना 15 जून रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, रांजणगाव शेनपुंजी इथल्या टॉपर क्लासेस या खाजगी ट्युशनमधील 45 वर्षीय सुभाष जाधव नामक शिक्षकाने चौथीतल्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केले आहेत. सुभाष जाधव हा गेल्या दीड वर्षांपासून रांजणगाव शेनपुंजी येथे नर्सरी कॉलनीमध्ये असलेल्या टॉपर क्लासेसमध्ये शिकवतो. तीन दिवसांपासून चौथीतल्या विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवत या नराधम शिक्षकाने लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात या शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीड वर्षांपासून रांजणगाव शेपू येथे नर्सरी कॉलनीमध्ये टॉपर क्लासेस या नावाने आरोपीची शिकवणी आहे. एम.ए. इंग्रजी एम.एड असलेल्या सुभाष जाधवसह तीन शिक्षकांनी मिळून ही शिकवणी सुरू केली होती. तीन दिवसांपूर्वी चौथीत शिकणाऱ्या अकरा वर्षीय विद्यार्थिनीला नराधमाने अश्लील व्हिडिओ दाखवत अत्याचार केले.
धक्कादायक बाब म्हणजे या नराधम शिक्षकाने विद्यार्थिनीवर अत्याचार केल्यानंतर हा प्रकार घरी सांगितला तर आई-वडिलांचे तुकडे करेल अशी धमकीही दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या या मुलीने क्लासला जाणेच बंद केले होते. मुलगी क्लासला जात नसल्याने घरच्यांनी विचारपूस केली असता मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितला. आपल्या मुलीसोबत असा प्रकार घडल्याचे समजताच मुलीच्या वडिलांनी या शिक्षकाला चांगलाच चोप दिला. त्यानंतर वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.





















