
जळगाव मिरर | १८ जून २०२५
मध्यरात्रीच्या वेळी बंद असलेल्या कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमधून चोरट्यांनी संगणकाचे तीन संच चोरून नेले. ही घटना दि. १४ जून रात्री ते दि. १५ जून रोजी सकाळी सातवाजेदरम्यान कोल्हे हिल्स परिसरातील सिद्धीविनायक चौकात घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील सिद्धीविनायक चौकामध्ये मनीषा विशाल पाटील (वय ४३) या वास्तव्यास आहे. त्यांचे घराशेजारीच कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट असून तेथे मुलांचे क्लास घेतले जातात. दि. १४ जून रोजी रात्री आठ वाजता इन्स्टिट्यूट बंद केल्यानंतर मध्यरात्री चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा कापला. त्यानंतर आत प्रवेश करून तीन मॉनिटर, तीन सीपीयु, तीन की बोर्ड, तीन माऊस व केबल चोरून नेले. दि. १५ रोजी सकाळी सात वाजता हा प्रकार लक्षात आला. या प्रकरणी मनीषा पाटील यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण इंगळे करीत आहेत.
कोल्हे हिल्स परिसरात ज्याठिकाणी चोरी झाली त्या परिसरात एका जणाच्या घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहे. चोरीची घटना त्याठिकाणी कैद झाली आहे. परंतू ज्यांच्याकडे सीसीटीव्ही लावले आहे ते बाहेरगावी गेले आहे. ते गावाहून परतल्यानंतरच पोलिसांना ते फुटेज मिळणार असून त्यानंतरच तपासाला वेग येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले