
जळगाव मिरर | २७ जून २०२५
गेल्या काही दिवसापासून राज्यात पुन्हा एकदा मराठी- हिंदी वाद सुरु झाला असून आता पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी या वर्गात हिंदी असू नये. पाचवीपासून हिंदी असावी. पहिलीपासून मुलांना मराठी शिकवावे, त्यांना मराठी लिहिता, वाचता यावे, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली आहे. तसेच पाचवीपासून हिंदी शिकवली तरी काही हरकत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपला पुरक अशी भूमिका घेतली आहे.
सध्या महाराष्ट्रात हिंदी सक्तीच्या विरोधात मोठा वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारला असता त्यावर पवार म्हणाले, पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी या वर्गात हिंदी असू नये. पाचवीपासून हिंदी असावी. पहिलीपासून मुलांना मराठी शिकवावे, त्यांना मराठी लिहिता, वाचता यावे. ज्यावेळेस मुले पहिलीपासून मराठी लिहायला वाचायला शिकतात तेव्हा हिंदीही लिहिता वाचता येते फक्त बोलण्यासंदर्भात असेल तर पाचवीपासून हिंदी शिकवली तरी काही हरकत नाही. पाचवीपासून हिंदी सक्ती करावी.
दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले, आमचे मंत्री दादा भुसे अनेकांना भेटत आहेत. हिंदी भाषेवर ज्यांनी आक्षेप घेतला आहे त्यांच्याशी चर्चा केली जाईल. त्यांच्याशी सल्लामसलत केली जाईल. आम्ही हिंदी अनिवार्य शब्द काढला आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. जोरजबरदस्तीने निर्णय घेणार नाही. आम्ही सर्वांशी बोलल्यानंतर यावर निर्णय घेऊ. मी मुख्यमंत्री असताना मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवला, महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची केली.
विरोधकांवर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधकांच्या काळात माशलकर समितीचा अहवाल स्वीकृत केला. कुठलाही निर्णय लादला जाणार नाही. जनतेच्या हिताचा निर्णय घेतला जाईल असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र हिंदी भाषा सक्तीवर थेट भूमिका घेणे टाळले.
अजित पवारांनी थेट भूमिका मांडली असली तरी भाजपमुळे शिवसेना शिंदे गटाची कुठेतरी गळचेपी होत आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. एकनाथ शिंदे यांनी थेट भूमिका मांडणे टाळले असून विरोधकांवरच खापर फोडले आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने मनसेसोबत मैदानात उतरण्याचे ठरवले आहे. 5 मार्च रोजी महायुती सरकारच्या या निर्णयाविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत.




















