शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या आजच्या कामकाजात शिवसेनेच्या याचिकेचा समावेश नाही. शिवसेनेने बंडखोरांविरोधात केलेल्या याचिकेची सुनावणी यापूर्वी सुटीकालीन न्यायालयात झाली होती. उन्हाळी सुट्टी संपून सर्वोच्च न्यायालयाचे नियमित कामकाज आजपासून सुरु होणार आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या कामकाजात शिवसेनेच्या याचिकेचा समावेश नसल्याने यावर उद्या किंवा परवा सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी यासाठी शिवसेनेतर्फे आज सरन्यायाधीशांना विनंती केली जाणार असल्याची माहिती आहे.
शिंदे सरकारचे भवितव्य ठरणार
शिवसेनेच्या 16 आमदारांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी बजावलेल्या अपात्रतेच्या नोटिसीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. सरकारचा विश्वासदर्शक ठराव हा न्यायालयाच्या आदेशास अधीन असल्याचे न्यायालयाने पूर्वीच्या सुनावणीत स्पष्ट केले होते. एकूणच न्यायालयाच्या निवाड्यावर शिंदे सरकारचे भवितव्य अवलंबून असल्याने सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
53 आमदारांना व्हीप
दरम्यान, विधिमंडळ सचिवालयाने आदित्य ठाकरे यांना वगळून शिवसेनेच्या 53 आमदारांना ‘व्हीप’ उल्लंघनाबद्दल नोटिसा बजावल्या आहेत. तसेच सुनावणीच्या पूर्वसंध्येला रविवारी शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची सकाळी ‘मातोश्री’वर बैठक झाली.




















