मुंबई : वृत्तसंस्था
सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयाशिवाय शिंदे गटातील १६ आमदारांवर कोणतीही कारवाई करु नये, असा आदेश सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी विधानसभा अध्यक्षांना केली आहे. त्यामुळे शिवसेनेशी बंड केलेल्या १६ आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी पत्रकार परिषद घेत मोठे विधान केले आहे. ‘आमचे राज्य आले आहे. शिंदेसाहेब आणि फडणवीस यांना चांगले राज्य करून द्या. आता पुढचा मार्ग हा कुटुंब प्रमुखाने काढायचा असतो. आम्ही त्यांना विनंती करू शकतो पण त्यांना आदेश देऊ शकत नाही’ असे म्हणत दीपक केसरकर यांनी शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना साद घातली. तसेच, मला विश्वास आहे की उद्धव साहेब लवकरच आम्हाला आशीर्वाद देतील. १-२ सदस्य असे आहेत ज्यांची उद्धव ठाकरेंसोबत रोज भेट होते, असा मोठा गौप्यस्फोटही केसरकरांनी केला.
दीपक केसरकर म्हणाले, एक सर्वसाधारण शिवसैनिक बोलू शकत नाही. बाळासाहेबांचे जुने शिवसैनिक बोलू शकत नाही. मन दुखवण्याचे विधान करणे बंद करावे. सर्व सामान्य शिवसैनिकांना वाटत नाही, काँग्रेसबरोबर जावे. तुम्ही हवे तर जनमताचा कौल घ्यावा. ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यात दिसून आले. आमची शक्ती काँग्रेस-राष्ट्रवादीने घ्यायची आणि आमचीच पक्ष संपवायचा हे योग्य नाही, अशी टीका केसरकरांनी केली.
‘मला कळले की आज खासदारांची बैठक झाली. त्यात दौपदी मुर्मू यांना समर्थन देण्याचे ठरले आहे. ही आनंदाची बातमी आहे. आम्ही कुणीही उद्धव साहेबांच्या विधानावर बोलणार नाही. आणि इतर कुणीही देवू नये अशी आमची भुमिका आहे. पण याचा अर्थ असा नाही की इतर लोक बोलले तर आम्ही काहीच बोलणार नाही. आम्ही आमच्या मित्र पक्षालाही स्पष्टपणे आहे की त्यांनी ही उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बोलू नये, असा इशाराही केसरकरांनी सोमय्यांचं नाव न घेता दिला.
मला १००-१५० कॅाल येतात. ते मी सगळ्यांचे फोन उचलतो. ते सर्व आमचे अभिनंदन करतात. आणि शिंदेसाहेबांनी कधी मदत केली ते सांगतात. पण त्यांचे हेच म्हणणे आहे की उद्धव साहेबांच्या आशिर्वादाने हे सरकार चालावे. मला विश्वास आहे की साहेब लवकरच आम्हाला आशिर्वाद देतील. १-२ सदस्य असे आहेत ज्यांना उद्धव ठाकरेंची रोज भेट मिळते, असा खुलासाही केसरकरांनी केला.
आम्ही राष्ट्रीय पक्ष हे भाजपमुळे झालो आहोत. अमित शहांनी वारंवार आम्हाला भेट दिली. आम्ही साहेबांना म्हणत होतो की, तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडा आम्ही सगळे तुमच्यासोबत येतो. पण त्यांनी तसे केले नाही. आज पवारसाहेब जास्त लाडके झाले आहेत आणि शिवसैनिक लांबचे झाले आहे, अशी नाराजीही केसरकरांनी व्यक्त केली.




















