मुंबई : वृत्तसंस्था
भविष्यात भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदेंशी (Eknath Shinde) जुळवून घ्या, अशी मागणी शिवसेना (Shiv Sena) खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली आहे. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत खासदारांची भूमिका जाणून घेण्यासाठी आज मातोश्री येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिल्यास भाजप-शिवसेना युतीसाठी चर्चेची दारं उघडी राहतील, असे मत खासदारांनी उद्धव ठाकरेंसमोर मांडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आता आमदारांपाठोपाठ खासदारांनीही भाजपसोबत जाण्याची भूमिका मांडल्याने उद्धव ठाकरे लवकरच भाजप-शिवसेना युतीबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
या बैठकीत एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा द्यावा अशी भूमिका काही खासदारांनी घेतली. देशात भाजपने मोठी ताकद निर्माण केली आहे, आपण त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे. शिंदेसोबत ५० आमदार आहेत. ते आजही मनाने आपलेच आहेत. आपण एकनाथ शिंदेंशीही जुळवून घेतलं पाहिजे. एकनाथ शिंदे आणि भाजपनं सत्ता स्थापन केली आहे. आपण दोघांशीही जुळवून घेतलं तर भविष्यात पक्षाचं हिताचं होणार आहे.अशी भावना काही खासदारांनी या वेळी व्यक्त केली. दरम्यान, द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यायचा की नाही हे अद्याप ठरलं नसलं तरी आजच्या बैठकीत त्याबाबतचा निर्णय झाल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच शिवसेनेच्या खासदारांचे एक शिष्टमंडळ मुर्मू यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते. त्यानंतर जर शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला तर त्या मातोश्रीवर आभार मानण्यासाठी येऊ शकतात, अशीही माहिती मिळाली आहे.




















