मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आता ‘मिशन मुंबई मनपा’साठी कामाला लागले आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज मुंबईत राष्ट्रवादीच्या विभागीय नेत्यांची बैठक घेतली. बैठकीत शरद पवार यांनी आगामी महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आतापासूनच तयारीला लागण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. महानगरपालिका निवडणुकीसाठी आपल्यासोबत कुणी असो वा नसो याचा विचार करत बसू नका, तयारीला लागा, असे स्पष्ट निर्देश शरद पवार यांनी पदाधिकारी आणि वॉर्ड अध्यक्षांना दिले आहेत.
शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुंबई महानगरपालिकेसाठीची सर्व धुरा आपल्या हाती घेतल्याचं दिसून येत आहे. दर २० दिवसांनी शरद पवार मुंबईतील परिस्थितीचा वॉर्ड अध्यक्षांकडून आढावा घेणार आहेत. कुठल्या वॉर्डात पक्षाचं प्राबल्य जास्त आहे असे वॉर्ड निश्चित करून त्याचा आढावा शरद पवार घेणार आहेत. कार्यकर्त्यांना ते म्हणाले, कुणी सोबत येतंय की नाही याची वाट पाहात बसू नका आणि प्रत्येक वॉर्डात तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे मुंबई मनपाची सत्ता राखण्याचं आव्हान यावेळी शिवसेनेसमोर असणार आहे. यातच महाविकास आघाडी मुंबई मनपाला एकत्रित सामोरं जाणार का? याबाबतही अद्याप कोणतीच स्पष्टता आलेली नाही. त्यामुळेच महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची धुरा स्वत: शरद पवार हाती घेणार असल्याचं बोललं जात आहे.




















