
जळगाव मिरर | २५ जुलै २०२५
कंपनीच्या कंपऊंडमधून दुचाकीसह सोया पनीर बनविण्याचे मशिन चोरुन नेणाऱ्या प्रशांत उर्फ बाप्या पंडीतराव साबळे व नितीन उर्फ मित्या रोहीदास चव्हाण (दोघ रा. सुप्रिम कॉलनी) यांच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून चोरलेला १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहरातील एमआयडीसीतील व्ही सेक्टरमध्ये असलेल्या भोसले इंडस्ट्रीज कंपनीच्या कंपाऊंडमध्ये लावलेली दुचाकी आणि तेथे ठेवलेली सोया पनीर बनविण्याची मशिनरी दि. २० ते दि. २२ रोजी दरम्यान चोरट्यांनी चोरुन नेली होती. याप्रकरणी सुरेश रामचंद्र पाटील याच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी संशयितांचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना एमआयडीसी पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक राहुल तायडे, पोहेकॉ गिरीश पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी यांचे पथक रवाना केले.
पथकाने कंपनीच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यावेळी त्यांना दोन इसम संशयास्पदरित्या फिरतांना आढळून आले. त्यानुसार राहुल रगडे व विशाल कोळी यांनी प्रशांत उर्फ बाप्या पंडीतराव साबळे व नितीन उर्फ मित्या रोहीदास चव्हाण (दोघ रा. सुप्रिम कॉलनी) या दोघ संशयितांना ताब्यात घेतले. दोघ संशयितांची एमआयडीसी पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना दि. २५ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीत त्यांनी चोरलेली दुचाकी आणि सोया पनीर बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. पुढील तपास पोहेकॉ संजीव मोरे, मंदार महाजन हे करीत आहे.




















