
जळगाव मिरर | ८ ऑगस्ट २०२५
शहरातील कोल्हे नगर परिसरात बुधवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास मित्राच्या घरी आलेल्या दोन जणांनी गावठी कट्टूयातून गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस कोल्हे नगरात पोहचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करीत तेथून रिकामे पुंगळी जप्त केली. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील कोल्हे नगरात राजदीप राजू सपकाळे (वय ४०) हे गेल्या काही महिन्यांपासून भाडेतत्वावर राहण्याकरीता आले आहे. बुधवारी रात्रीच्या सामारास त्यांचा मित्र दीपक तरडे आणि ललित कोळी हे त्याला भेटण्याकरीता आले होते. त्याचे मित्र ज्या खोलीत बसले होते, त्याच खोलीत रात्री गोळीबार झाल्याचा आवाज आला. गोळीबार केल्यानंतर दोघे जण तेथून निघून गेले. त्यानंतर सपकाळे कुटुंबियांमध्ये भितीचे वातावरण पसरल्याने त्यांनी घटनेची माहिती कोणालाही दिली नाही.
राजदीप व त्यांचे कुटुंबिय जेवण करीत असतांना त्यावेळी दीपक तरडे हा त्यांच्या घरी आला. त्याने त्याच्याजवळ असलेली गावठी कट्टा हा सपकाळे यांना दाखवित असतांनाच त्याने गोळीबार केला. त्यानंतर तो गोळी चुकून मारली गेली असे सांगून तेथून पसार झाल्याचे राजदीप यांची पत्नी सरला सपकाळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. राजदीप सपकाळे हे तीन महिन्यांपासून याठिकाणी भाडेतत्वावर राहत होते. घर मालकाने याबाबत मनपा किंवा पोलीस स्टेशनला देणे बंधनकारक होते. मात्र घरमालकाने याबाबत कुठलीही माहिती न दिल्यामुळे घर मालक देवेंद्र भिमराव शेळके रा. ‘कोल्हे नगर’ यांच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
गोळीबार करणाऱ्यांची नावे निष्पन्न होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांसह रामानंद नगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाकडून संशयिताचा शोध सुरु होता. याप्रकरणी एका संशयिताला रामानंद नगर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली जात होती, तर गोळीबार करणाऱ्या दुसऱ्या संशयिताचा पोलिसांकडून शोध घेतला जात होता. रात्री गोळीबार झाल्यानंतर रात्रभर या घटनेची वाच्यता न झाल्याने कोणालाही माहिती नव्हती. दरम्यान, गुरुवारी दुपारच्या सुमारास या घटनेची माहिती रामानंद नगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, एलसीबीचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह पथकाने घटनास्थळी तात्काळ धाव घेतली.




















