
जळगाव मिरर | ११ ऑगस्ट २०२५
राज्यातील पुणे जिल्ह्यातल्या कुंडेश्वर येथे महादेवाच्या दर्शनाला जाणारी पिकअप व्हॅन उलटून 9 महिला भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. या अपघातामध्ये जवळपास 20 भाविक जखमी झाल्याचे समजते.
सविस्तर वृत्त असे कि, पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात कुंडेश्वर येथे महादेवाचे सुप्रसिद्ध मंदिर आहे. श्रावणी सोमवारनिमित्त येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. या भाविकांच्या व्हॅनचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात पाईट नावाचे गाव आहे. येथील कुंडेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. पुण्यापासून साधारणतः दीड तासाच्या अंतरावर निसर्गरम्य ठिकाणी हे मंदिर असून, येथे भाविकांची मोठी गर्दी असते. श्रावणी सोमवारचे निमित्त साधून आजही भाविकांची एक व्हॅन कुंडेश्वर येथे निघाली होती. मात्र, दुपारी सव्वाच्या सुमारास या व्हॅनचा अपघात झाला. घाटातल्या रस्त्यावरून जाताना व्हॅन मागे आली. त्यामुळे ती उलटल्याचे समजते.
घाट चढताना अचानक व्हॅन मागे आली. गाडीने पाच-सहा पलट्या खाल्ल्या. त्यानंतर व्हॅन रस्त्याच्या कडेला कोसळली. या घटनेत नऊ महिला भाविकांचा मृत्यू झाल्याचे समजते. अजून वीस भाविक जखमी झालेत. त्यात अनेक जण गंभीर आहेत. अपघातामधील मृत आणि जखमी भाविक पापळवाडी येथील असल्याचे समजते. यातील जखमींवर सध्या पाईट येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मदतीसाठी स्थानिकांनी धाव घेतली. त्यामुळे अनेकांना वेळेवर उपचार मिळाले. अपघाताच्या घटनेचा खेड पोलिसांनी तपास सुरू केला आहे.




















