
जळगाव मिरर | १६ ऑगस्ट २०२५
राज्यातील तरुणांना हाताला काम नसल्याने अनेक तरुण गुन्हेगारी विश्वाकडे वळत असल्याचे अनेक घटनेमधून समोर येत आहे. आता कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरातील मंगळवार पेठ परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत बनावट नोटा छापणारा घरगुती कारखाना उद्ध्वस्त केला आहे. ही कारवाई करताना पोलिसांनी ₹2,24,200 किमतीच्या बनावट नोटा आणि छपाईसाठी वापरले जाणारे सुमारे ₹70,700 किमतीचे साहित्य, म्हणजेच प्रिंटिंग मशीन, स्कॅनर, विशेष प्रकारचा कागद, शाई आणि संगणकीय साधनांसह एकूण ₹2,94,900 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांची नावे अशी आहेत. अनिकेत विजय शिंदे (वय 24), राज रमेश सनदी (वय 19) आणि सोएब अमजद कलावंत (वय 19), तिघेही इचलकरंजीचे रहिवासी आहेत.
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक बाब समोर आली आहे की, या आरोपींनी यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून बनावट नोटा छापण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. त्यांनी इंटरनेटवरून माहिती मिळवून प्रिंटिंगसाठी लागणारी अत्याधुनिक यंत्रसामग्री खरेदी केली आणि घरातच बनावट नोटा छापण्याचा कारखाना उभारला. आरोपी गेल्या काही महिन्यांपासून या अवैध कारवायांमध्ये सक्रिय होते. त्यांनी छपाई करून नोटा बाजारात पुरवण्याचा डाव आखला होता. छापलेल्या नोटा मूळ नोटांप्रमाणेच भासणाऱ्या असल्यामुळे सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होण्याची शक्यता होती. मात्र, LCB पथकाच्या वेळीच केलेल्या कारवाईने हा कट उधळून लावण्यात यश आले आहे.
या प्रकरणातून आणखी आरोपी व राज्यभरातील इतर ठिकाणी असलेल्या रॅकेट्सबाबत माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तपास अधिक खोलवर सुरु असून, अन्य जिल्ह्यांमध्येही अशा प्रकारच्या बनावट नोटा रॅकेटचा विस्तार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, नोटा स्वीकारताना त्या बारकाईने तपासाव्यात आणि संशयास्पद हालचाली किंवा माहिती त्वरित पोलिसांना कळवावी.





















