
जळगाव मिरर | २५ ऑगस्ट २०२५
राज्यातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पित्याने आपल्या लहान मुलीला गिरणा नदीत फेकले आणि त्यानंतर स्वतःही उडी घेतली. ही थरारक घटना गिरणा नदी पुलावरील टेहरे फाटा येथे घडली. या घटनेत बाप-लेकीचे प्राण धोक्यात आले होते, मात्र काही स्थानिक तरुणांनी देवदूतासारखे धाव घेत त्यांना वाचवले. या घटनेने मालेगावमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादामुळे एका पित्याने आपल्या चार वर्षांच्या मुलीला नदीत फेकले आणि त्यानंतर स्वतःही उडी मारली. यामुळे बाप-लेकीचे प्राण धोक्यात आले होते. ही घटना पाहून उपस्थितांना धक्का बसला. मात्र, याच वेळी काही स्थानिक तरुण देवदूतासारखे धावले. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता नदीत उडी घेतली आणि बाप-लेकीला सुरक्षित बाहेर काढले. या धाडसामुळे दोघांचाही जीव वाचला. मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती स्थिर आहे. दुसरीकडे, पोलिसांनी पित्याला ताब्यात घेतले आहे. या तरुणांच्या साहसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ज्या तरुणांनी बाप लेकीचा जीव वाचवला त्यांनी माहिती देताना सांगितले की, पित्याने मुलीला नदीत फेकून दिले, नंतर त्यानेही नदीत उडी घेतल्याची माहिती स्थानिकांनी दिली. मुलीला नदीच्या पाण्यात फेकल्यानंतर आम्ही लगेच त्या ठिकाणी जात नदीत उड्या घेतल्या. त्यानंतर मुलीला आम्ही बाहेर काढले व तातडीने मुलीला दवाखान्यात नेले. दरम्यान, या नदीचे पाणी चांगलेच खोल आहे. वडिलांनी आपल्या मुलीला नदीत फेकत स्वतः उडी घेण्याचे कारण आद्यप अस्पष्ट आहे. पोलिसांनी तातडीने या वडिलांना अटक केली असून पुढील सविस्तर तपास सुरू करण्यात आला आहे.





















