
जळगाव मिरर | २७ ऑगस्ट २०२५
जिल्ह्यातील चाळीसगाव येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाजपचे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या धुळ्यातीलच खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री चाळीसगाव मधील वैष्णवी साडी सेंटरजवळ ही घटना घडली. चौधरी यांना एकटे गाठून अज्ञात व्यक्तींनी धारदार कोयत्याने सपासप वार केले. हल्ल्यानंतर चौधरी गंभीररीत्या जखमी झाले असून, प्रचंड रक्तस्राव झाल्याची माहिती आहे.स्थानिक रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वीच पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रभाकर चौधरी यांच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर रात्रीच्या सुमारास वैष्णवी साडी सेंटरजवळ काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना अडवून त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात चौधरी यांना मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथके रवाना केली आहेत. हा हल्ला नेमका कोणी आणि कोणत्या कारणावरून केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपासाअंतीच यामागील खरे कारण समोर येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.




















