
जळगाव मिरर । १९ सप्टेंबर २०२५
शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे जिल्ह्यातील हजारो गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण आहे. मात्र, या रुग्णालयात सध्या गंभीर स्वच्छता समस्येचे साम्राज्य निर्माण झाले असून, रुग्णांच्या आरोग्यावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.
रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून पहिल्या ते तिसऱ्या मजल्यापर्यंत असलेल्या जिन्यांवर मोठ्या प्रमाणावर घाण आणि दुर्गंधीचे वातावरण पसरलेले आढळले. रुग्ण आणि नातेवाईक यांना या दुर्गंधीतूनच रुग्णसेवेसाठी आत जावे लागत आहे. साफसफाईचे सर्व नियम धाब्यावर बसवले गेले असल्याचे यावरून स्पष्ट दिसून येते. हे रुग्णालय जिल्ह्यातील ग्रामीण व शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी महत्त्वाचे आरोग्यसेवा केंद्र आहे. येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असून, यामध्ये लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचा समावेश असतो. अशा स्थितीत परिसरातील अस्वच्छता हे संसर्गजन्य रोगांना आमंत्रण देणारे ठरत आहे.
रुग्णालय प्रशासनाने स्वच्छतेसंदर्भात उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. रुग्णालय म्हणजे केवळ उपचार केंद्र नव्हे, तर रुग्णांच्या पुनःस्वास्थ्याचा पहिला टप्पा असतो. त्यामुळे प्रशासनाची जबाबदारी अधिक जबाबदारीने पार पाडणे गरजेचे आहे. तातडीने स्वच्छतेसंबंधी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे. अन्यथा, संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कार्यवाही करण्यात यावी, अशी भावना देखील व्यक्त होत आहे.




















