जळगाव मिरर | २२ जुलै २०२६
रावेर तालुक्यातील गारखेडा येथे जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याने काकाची लाकडी काठीने मारहाण करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्या केल्यानंतर हा प्रकार अपघात असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी मृतदेह नाल्याच्या कडेला टाकण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले. या प्रकरणी रावेर पोलिसांनी अवघ्या काही तासांत गुन्ह्याचा उलगडा करत आरोपी अनिल जखा बारेला (वय २९, रा. गारखेडा, ता. रावेर) याला २२ जुलै रोजी रात्री अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाल पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील गारखेडा गावात रामा थावरू बारेला (वय ४६) यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत नाल्यालगत पडलेला असल्याची माहिती गावातील पोलिस पाटलांनी रावेर पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घटनास्थळी मृताच्या डोक्याच्या उजव्या बाजूस गंभीर दुखापतीच्या खुणा आढळून आल्याने हा अपघात नसून घातपात असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. त्यानुसार तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली.
सखोल तपासात मयत रामा बारेला आणि त्यांचा पुतण्या अनिल बारेला यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जमिनीच्या कारणावरून सातत्याने वाद सुरू असल्याचे निष्पन्न झाले. २१ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर संतापाच्या भरात अनिल बारेला याने लाकडी काठीने काकाच्या डोक्यावर जोरदार वार केला.
डोक्याला गंभीर मार लागल्याने रामा बारेला यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गुन्हा लपविण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेह सुमारे २० ते २५ मीटर अंतरापर्यंत ओढत नेऊन नाल्याच्या कडेला टाकला, जेणेकरून हा प्रकार अपघाती मृत्यू असल्याचे भासावे. मात्र, घटनास्थळावरील परिस्थिती, जखमांचे स्वरूप आणि पोलिसांच्या बारकाईच्या तपासामुळे हा बनाव फार काळ टिकू शकला नाही. संशयित म्हणून ताब्यात घेतल्यानंतर चौकशीदरम्यान अनिल बारेला याने गुन्ह्याची कबुली दिली.
याप्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. या हत्येमागील इतर कारणांचा तसेच घटनेच्या सर्व पैलूंचा तपास रावेर पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे गारखेडा गावात खळबळ उडाली असून, क्षुल्लक वादातून नात्यांचे रक्तरंजित रूप समोर आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.





















