जळगाव मिरर /२३ जुलै २०२६
“विकासाच्या गप्पा मोठ्या, पण गावाचा रस्ता मात्र मृत्यूचा सापळा!” अशी संतप्त प्रतिक्रिया पिंप्री (ता. यावल) येथील ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. गेल्या दशकभरापासून गावाला दर्जेदार डांबरी रस्त्याची प्रतीक्षा असून, नुकतीच करण्यात आलेली वरवरची डागडुजी पहिल्याच पावसात वाहून गेल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.

आज सकाळी शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस रस्त्यातील चिखलात अडकली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र बसमधील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांच्या मते, ही केवळ नशिबाची साथ होती. अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
रस्त्यावर जागोजागी खोल खड्डे, चिखलाचे साम्राज्य, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी आवश्यक असलेल्या नाल्यांचा व छोट्या पुलांचा अभाव, तसेच नियमानुसार साईड पट्टी न केल्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात गावकऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
याहूनही गंभीर बाब म्हणजे, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मागील काही वर्षांत अनेक रुग्णांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळू शकले नाहीत. रुग्णवाहिका वेळेत पोहोचू न शकल्याने काहींना आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ही परिस्थिती केवळ गैरसोयीची नसून मानवी जीवनाशी थेट संबंधित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्वातंत्र्यानंतर अनेक दशकं उलटून गेली, शासनाच्या विविध योजना राबवल्या गेल्या; मात्र पिंप्री गावातील नागरिक आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत आहेत. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही ठोस आणि टिकाऊ उपाययोजना न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
ग्रामस्थांची एकमुखी मागणी आहे की, रस्त्याची केवळ डागडुजी न करता तांत्रिक निकषांनुसार दर्जेदार डांबरीकरण, आवश्यक साईड पट्ट्या, पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी नाले व छोटे पूल यांची तातडीने उभारणी करण्यात यावी. अन्यथा भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित यंत्रणेवर राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
“विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ थांबवा… पिंप्रीला सुरक्षित रस्ता द्या!” अशी आर्त हाक आता संपूर्ण गावातून दिली जात आहे.





















