
जळगाव मिरर | २४ सप्टेंबर २०२५
केसीई सोसायटी संचलित मूळजी जेठा महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन संकल्प गीत गायनाने करण्यात आले.
या विशेष दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना एन.एस.एस. बद्दल विशेष माहिती देण्यात आली. सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. अखिलेश शर्मा यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व, युवकांची समाजातील भूमिका तसेच स्वयंसेवकांनी अंगीकारावयाचे मूल्य यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अमलदार मा. श्री. रवींद्र प्रल्हाद तायडे उपस्थित होते. त्यांनी युवांना सायबर क्राईम, क्रीडा आणि व्यसनमुक्ती या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. आपल्या सादरीकरणासाठी त्यांनी साद्यंत पी.पी.टी.चा वापर करून विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले.
त्यांनी आपल्या भाषणात युवकांनी दोन गोष्टी सदैव लक्षात ठेवाव्यात असे सांगितले – लालच टाळणे आणि भय (भीती) मनात ठेवणे.कोणतेही कार्य करण्यापूर्वी “हे शक्य आहे का?”असा विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. पुढे त्यांनी विविध सायबर स्कॅम्स, मोबाईलच्या दुष्परिणामांची माहिती दिली. विद्यार्थ्यांना रुचकर पद्धतीने विविध फोटोंच्या माध्यमातून त्यांनी गंमती-जमती सांगत महत्त्वाचे मुद्दे समजावून दिले. त्यांच्या या मार्गदर्शनाचा निस्वार्थ हेतू युवक पिढी जागृत, सजग व जबाबदार बनावी हा होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.रुचिता गणेश सोनगीरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन कु.जागृती सोनवणे यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यक्रम अधिकारी डॉ. विशाल देशमुख, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. अखिलेश शर्मा आणि महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. जयश्री भिरूड यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व एन.एस.एस. स्वयंसेवक व स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण प्रेरणादायी ठरले. “मी नव्हे तर तू” या एन.एस.एस. च्या ब्रीदवाक्याचा संदेश विद्यार्थ्यांनी अंगीकारावा, असा सूर संपूर्ण कार्यक्रमभर उमटला




















