
जळगाव मिरर । २४ सप्टेंबर २०२५
राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे तर दुसरीकडे खान्देशातील नंदुरबार येथे मूक मोर्चाला आज दि २४ हिंसक वळण लागलं. आदिवासी युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ नंदुरबारमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. त्या मोर्चाला हिंसक वळण लागलं. त्यानंतर आंदोलक आणि पोलीस यांच्यात झडप झाली. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील गाड्यांची तोडफोड केली. यानंतर पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज देखील केला.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरात काही दिवसांपूर्वी झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या जय वळवी या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने नंदुरबारमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि जय वळवीला न्याय मिळावा या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मूक मोर्चाला हिंसक वळण लागले. सुरुवातीला शांततेत सुरू झालेल्या या मोर्चानंतर काही उपद्रवी व्यक्तींनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील गाड्यांची तोडफोड केली. यामुळे मोठा गोंधळ उडाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलीस आणि आंदोलकांमध्ये दगडफेक झाली. यानंतर मोर्चामध्ये सहभागी झालेल्या लोकांमध्ये एकच धावपळ सुरू झाली. अखेर, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला.
जय वळवीवर हल्ला करणाऱ्या सूर्यकांत मराठे या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी आदिवासी संघटनांनी केली आहे. आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या असून, जय वळवीला लवकर न्याय मिळावा यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशीही मागणी संघटनेने केली आहे. आरोपींना कठोर शिक्षा झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.




















