
जळगाव मिरर | २९ सप्टेंबर २०२५
देशभरात नवरात्रोत्सवाची धामधूम सुरु असून मध्यप्रदेश राज्यातील खरगोन जिल्ह्यातून येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. “ओ मेरे ढोलना…” या सुरेल गाण्यावर पतीसोबत गरबा साजरा करताना अचानकच आयुष्याच्या नृत्यातून कायमची एक व्यक्ती अलग झाली… खरगोन जिल्ह्यातील पलासी गावातील दुर्गा पूजा पंडालमध्ये रविवारी रात्री घडलेली ही घटना साऱ्या गावाला भावविवश करणारी ठरली.
सोनम (वय १९) ही आपल्या पती कृष्णपालसोबत दुर्गा पूजेनिमित्त आयोजित गरबा कार्यक्रमात सहभागी झाली होती. भजन, नृत्य, भक्तिभावाने भारलेले वातावरण… आणि त्या ओळी – “कसम लूं मैं रब की… ओ मेरे ढोलना…” सुरू असतानाच सोनमने पतीसोबत प्रेमाने गरबा सादर करायला सुरुवात केली. हसत, नाचत, देवतेसमोर भक्तिभावाने तिने काही क्षण रंगवले… आणि अचानकच तिचे शरीर जमिनीवर कोसळले. सुरुवातीला उपस्थितांनी हा देखावा गरब्याचा भाग समजून दुर्लक्ष केलं. पण काही क्षणातच सोनम जागेवरून उठली नाही. कृष्णपालने घाबरत तिला हलवण्याचा प्रयत्न केला. पण तिचा श्वास थांबलेला होता. उपस्थितांनी तात्काळ मदतीचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
या वर्षी मे महिन्यात सोनम आणि कृष्णपालचा विवाह झाला होता. लग्नानंतरचा पहिला नवरात्र, पहिला गरबा, आणि तोही अखेरचा ठरला… एका नवविवाहित तरुणीच्या आयुष्याचा अंत अशा दुर्दैवी प्रसंगात झाला. ही घटना सोमवार सकाळी व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे उजेडात आली. सोनमच्या अचानक निधनाने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. नवरात्रातील जल्लोषाच्या दरम्यान ही घटना साऱ्यांना थांबून विचार करायला लावणारी ठरली.





















