जळगाव : प्रतिनिधी
पाळधी ते तरसोद बायपासच्या दुरुस्तीचे काम करतांना क्रेनसह खाली कोसळून चालकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी ठेकेदार हरिओम लक्ष्मीनारायण ओझा (रा. इंदूर, मध्यप्रदेश) याच्यासह दुसऱ्या क्रेन ऑपरेटरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहराबाहेरुन गेलेल्या तपाळधी ते तरसोद बायपासवर दुरुस्तीचे काम सुरु असतांना दि. २३ ऑक्टोबर रोजी क्रेन चालक मधुकर धनराज पाटील (वय ४३, रा. खपाट, ता. धरणगाव) यांनी रेल्वे पुलाच्या सिमेंट काँक्रीटचे जाईंट स्लॅप काढण्यासाठी ते क्रेनने वर उचलून धरले होते. तसेच पुलाच्या दुसऱ्या बाजूला दुसऱ्या क्रेनचा ऑपरेटर बन्समनी जानकीप्रसाद प्रजापती (वय ५२, रा. बुढाडांड, जि. जियावन, मध्यप्रदेश) याने क्रेनच्या सहाय्याने सिमेंट काँक्रीटच्या स्लॅपला खालच्या बाजूने उचलेले होते. मात्र त्याने खालचा आधार काढून घेतल्याने मधुकर पाटील हे हाताळत असलेल्या क्रेनची रोप वायर तुटून क्रेनसह ते पुलाच्या खाली कोसळून झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
कामाच्या ठिकाणी ठेकेदाराने मधुकर पाटील यांना सुरक्षेचे कोणतेही साधने दिले नाही व पुलाच्या खाली सुरक्षा जाळी न बांधता काम केले जात होते. या प्रकरणी मयताचा चुलत भाऊ दीपक वामन पाटील (५०, रा. खपाट, ता. धरणगाव) यांनी पाळधी पोलिस दूरक्षेत्र पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून ठेकेदार हरिओम ओझा व क्रेन ऑपरेटर बन्समनी जानकीप्रसाद प्रजापती या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





















