जळगाव मिरर | ६ ऑक्टोबर २०२५
हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गात आरक्षण लागू करावे, या प्रमुख मागणीसाठी सकल बंजारा समाज आक्रमक भूमिकेत आला आहे. या मागणीसाठी येत्या ७ ऑक्टोबर, मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आज ५ ऑक्टोबर रोजी शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत घेण्यात आली.
या पत्रकार परिषदेत जळगाव जिल्हा आरक्षण कृती समितीच्या वतीने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील बंजारा बांधवांनी सहभाग नोंदवला. यावेळी ७ ऑक्टोबर रोजी होणारा मोर्चा यशस्वी करण्यासाठी मोर्चाचा मार्ग, सहभागी होणाऱ्यांची संख्या आणि प्रशासनाकडे सादर करावयाचे निवेदन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मोर्चा सकाळी ११ वाजता जी.एस. मैदान (जळगाव) येथून सुरू होणार असून, त्याआधी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाभरातून हजारो बंजारा बांधव या मोर्चात सहभागी होणार असून, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात येणार आहे.
समाजाच्या हक्काच्या आरक्षणासाठी प्रत्येक गाव व तांड्यातून मोठ्या संख्येने बांधवांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी उपस्थित नेत्यांनी केले. गेल्या अनेक वर्षांपासून बंजारा समाज आरक्षणासाठी लढा देत आहे. हैदराबाद गॅझेटमध्ये आरक्षणाचा उल्लेख असूनही शासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. हा मोर्चा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि समाजाच्या एकजुटीचे दर्शन घडवण्यासाठी आयोजित केला जात असल्याचे कृती समितीने सांगितले. या आंदोलनाच्या माध्यमातून आरक्षणाचा लढा आणखी तीव्र केला जाईल, असा इशाराही देण्यात आला.
या पत्रकार परिषदेला आत्माराम जाधव, कांतीलाल नाईक, सुभाष जाधव, बी. बी. धाडी, चेतन जाधव, काशिनाथ चव्हाण, अर्जुन जाधव, अक्षय पवार, सुनील नाईक करण सिंग राठोड आदी उपस्थित होते.




















