कल्याण : वृत्तसंस्था
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र त्यानंतर राज ठाकरेंनी या अफवा असल्याचं सांगत चर्चा फेटाळून लावल्या होत्या. परंतु, आता खुद्द अमित ठाकरे यांनाच तुम्हाला मंत्रिपदावर काम करण्याची इच्छा आहे का, असा सवाल विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी हसून या प्रश्नाचं उत्तर दिलं.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा महासंपर्क दौरा ठाणे जिल्ह्यात सुरु आहे. कल्याणमधील विद्यार्थ्यांशी आज अमित ठाकरे संवाद साधत आहेत. या दौऱ्याची सांगता डोंबिवलीत होणार आहे. यावेळी सर्वात प्रथम त्यांनी कल्याणच्या पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा केल्या. यावेळी पत्रकारांनी त्यांना आताच्या सरकारमध्ये तुम्हाला मंत्रिपद घ्यायला आवडेल का? असा प्रश्न विचारला होता.
यावर त्यांनी हसत उत्तर दिले की “मला राज साहेबांच्या मंत्रिमंडळात काम करायला आवडेल” मात्र त्यांनी हे विधान कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला. संपूर्ण दौऱ्यात स्थानिक पत्रकारांशी चर्चा करत आहे, मात्र बाईट कोणाला दिला नाही असेही त्यांनी सांगितले.




















