जळगाव मिरर | १७ नोव्हेंबर २०२५
राज्यातील पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वसई परिसरातील सातिवली येथील श्री हनुमान शाळेत शिकणारी सहावीतील विद्यार्थिनी अंशिका गौर (वय 13) हिचा 15 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. गेल्या आठवड्यापासून ती रुग्णालयात उपचार घेत होती. कुटुंबीयांनी मुलीच्या मृत्यूस शाळेत देण्यात आलेली शिक्षा कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 8 नोव्हेंबर रोजी अंशिका आणि आणखी चार विद्यार्थी 10 मिनिटे उशिरा शाळेत पोहोचले होते. यामुळे त्यांना उठाबशांची शिक्षा देण्यात आली. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, अंशिकेला शाळेची बॅग पाठीवर ठेवून 100 वेळा उठाबशा काढायला सांगितले होते. शिक्षेनंतर तिच्या पाठीला आणि मानेला तीव्र वेदना सुरू झाल्या आणि ती उभीही राहू शकत नव्हती म्हणून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मनसे नेते सचिन मोरे यांनी सांगितले की, अंशिकेला पूर्वी आरोग्य समस्या होत्या तरीही तिला अशी शिक्षा दिली गेल्याचे निदर्शनास आले आहे. शाळेतील एका शिक्षकाच्या मते अंशिकेने प्रत्यक्षात किती उठाबशा काढल्या आणि तिच्या मृत्यूचे नेमके कारण काय हे तपासात स्पष्ट होईल. गटशिक्षण अधिकारी पांडुरंग गलंगे यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, तपासात मृत्यूचे वास्तविक कारण समोर येईल. या प्रकरणी अद्याप पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही. अंशिकाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला असून शाळेतील शिक्षेच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.




















