
जळगाव मिरर | २३ नोव्हेंबर २०२५
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अमानवी आणि क्रूर घटनेमुळे संपूर्ण समाजात संतापाची तीव्र लाट उसळली असून, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद , जळगाव महानगरातर्फे या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.
अभाविप च्या कार्यकर्त्यांनी आज जळगाव शहरात एकत्र येत या घटनेबद्दल आपला रोष व्यक्त केला. नराधम आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि पीडितेला न्याय मिळावा, या मागणीसाठी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी अभाविप च्या पदाधिकाऱ्यांनी शासनाकडे मागणी केली की, या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर जलदगती न्यायालयात खटला चालवावा. तसेच, अशा नराधमांना समाजापुढे एक कठोर उदाहरण म्हणून तत्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी जोरकसपणे करण्यात आली.
या निषेध आंदोलनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महानगर मंत्री चिन्मय महाजन, जिल्हा सहसंयोजक अमरसिंह राजपूत, नेहल चौधरी,मोहित सोनी, आदित्य जाधव यांच्यासह अनेक विद्यार्थी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी या घटनेची तीव्र शब्दात निर्भर्त्सना करत, न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याची ग्वाही दिली.
जनतेत संतापाचे वातावरण
मालेगावच्या या घटनेने केवळ जळगावच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचे वातावरण निर्माण केले आहे. महिला आणि बालकांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी सरकारने कठोर पाऊले उचलावीत, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.





















