
जळगाव मिरर | २४ नोव्हेंबर २०२५
अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे मका काढणीदरम्यान रुमाल थ्रेशर मशीनमध्ये अडकल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना शनिवारी घडली. नितीन सुरेश बिरारी (३६) असे मृत तरुणाचे नाव असून तो विवाहित व कुटुंबातील एकमेव कमावता होता.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पभूधारक शेतकरी सुरेश रामदास पाटील यांच्या नांद्री शिवारातील शेतात नितीन मका काढणीचे काम करत होता. मका दाणे खाली पडत असल्याने तो थ्रेशर मशीनखाली पाल टाकत असताना त्याच्या गळ्यातील लांब रुमाल अचानक मशीनच्या ब्लोअरमध्ये अडकला. क्षणातच रुमालाचा आवळा बसत त्याचा गळा घट्ट आवळला गेला. तातडीने अमळनेर येथील रुग्णालयात दाखल केल्यानंतरही उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
पश्चात आई-वडील, पत्नी, लहान मुलगा व मुलगी असा परिवार आहे. काही महिन्यांपूर्वीच नितीनच्या मोठ्या भावाचा, योगेश बिरारी याचा, अल्पशा आजाराने मृत्यू झाला होता. त्यालाही दोन मुले आहेत. त्यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी नितीनवर होती. आता त्याच्याही निधनाने दोन्ही भावांची कुटुंबे उघड्यावर पडली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.




















