
जळगाव मिरर | २८ नोव्हेंबर २०२५
बोदवड तालुक्यातील नाडगाव येथे ग्राम दक्षता पथकाच्या सतर्क तरुणांनी आणि रखवालदाराच्या धैर्यामुळे मोठा गुन्हा उघडकीस आला. राखवालदार राधेश्याम किशोर पावरा (२०) यांच्या धाडसाने चार संशयितांना पकडण्यात आले. त्यांच्या पिशवीतून मोठ्या प्रमाणात ५००, २०० आणि १०० रुपयांच्या बनावट नोटांची बंडले जप्त करण्यात आली. संशयितांना गावकऱ्यांनी पकडताच झालेल्या झटापटीत दोन जण जखमी झाले.
गेल्या दीड महिन्यापासून तालुक्यात चोरीच्या घटना वाढल्या असून सर्वाधिक चोऱ्या नाडगावमध्ये झाल्यामुळे बोदवड पोलिसांनी ग्राम दक्षता समिती सक्रिय केली. गुरुवारी पहाटे सुमारे सहा वाजता ठेवणीत असलेल्या नाडगाव येथील कोल्हाडी रस्त्यावरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात काही संशयित दडून बसल्याचा संशय रखवालदार राधेश्याम पावरा यांना आला.
पाहणीदरम्यान त्यांनी संशयित व्यक्तींना विहिरीतील मोटार केबल चोरताना पाहिले. रोकण्यासाठी गेले असता आरोपींनी चाकूने हल्ल्याचा प्रयत्न केला; परंतु रखवालदाराने धीर न सोडता प्रतिकार केला. त्याचवेळी त्यांच्या वडिलांनी शेतमालकांना माहिती दिली आणि ग्राम दक्षता पथकाचे तरुण तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. झटापटीदरम्यान एमपी पासिंगची कार घेऊन काही जण फरार झाले; मात्र चार संशयितांना गावकऱ्यांच्या मदतीने पकडण्यात आले.
दोन संशयितांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना जळगाव येथे हलविण्यात आले. उरलेले दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात आहेत. पकडलेल्या पिशवीत मोठ्या प्रमाणात नकली नोटांचे बंडल असल्याचे समोर आल्याने या टोळीचा मोठा रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या धाडसी कृतीमुळे ग्रामस्थांनी रखवालदार आणि ग्राम दक्षता पथकातील तरुणांचे कौतुक केले असून पुढील तपास बोदवड पोलिसांकडून सुरू आहे.




















