
जळगाव मिरर | २८ नोव्हेंबर २०२५
हॉटेल विक्रीच्या व्यवहारावरून बांधकाम व्यावसायिक खुबचंद प्रेमचंद साहित्या (वय ६०, रा. मोहाडी रोड) यांना रुममध्ये आलेल्या चार जणांनी बेल्टसह लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच तेथे टेबलावर ठेवल्या पाकीटातील २० ते २५ हजारांची रोकड जबरीने काढून ते पसार झाले. व्यवहारावरून ही घटना दि. २६ रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास हॉटेल के पी. प्राईडमधील रुम नंबर २०७ मध्ये घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील हॉटेल व्यावसायीक असलेले खूबचंद साहीत्या यांचे के पी. प्राईड नावाचे हॉटेल आहे. त्यांचा मुलगा नितीन साहित्या याने व्यवसायाकरीता काही वर्षांपुर्वी बँकांसह इतर लोकांकडून पैसे घेतले होते. त्या पैशांची परतफेड होत नसल्याने आणि घेतलेल्या कर्जाची रक्कम वाढत असल्याने दोन वर्षांपुर्वी त्यांच्या मालकीची के पी. प्रा-ईड हॉटेल एका व्यक्तीला विकली होती. परंतू एक वर्ष उलटून देखील त्यांनी हॉटेलची खरेदी न केल्यामुळे तो व्यवहार रद्द केला होता. त्यानंतर देखील व्याजाची रक्कम मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्यांनी पुन्हा हॉटेल विक्रीसाठी काढली होती.
त्यावेळी हॉटेलचा व्यवहार हा दहा कोटी रुपयात होवून तीन कोटी रुपये घेवून नितीन साहीत्या याने सौदापावती केली होती. तसेच सौदापावती होवून सात ते आठ महिन्यांचा कालावधी उलटून देखील हॉटेलची खरेदी झाली नाही. बुधवार दि. २६ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास खुबचंद साहित्या हे त्यांच्या हॉटेलमधील रुम नं. २०७ मध्ये आराम करीत होते. त्यावेळी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास चार अनोळखी इसम त्यांच्या रुममध्ये शिरले. त्यांनी काहीही न सांगता कमरेला लावलेल्या बेल्ट व लाथाबुक्क्यांनी साहित्या यांना बेदम मारहाण केली. तसेच टेबलावर ठेवलेल्या त्यांच्या पाकीटातून २० ते २५ हजारांची रोकड काढून ते पसार झाले.
खुबचंद साहित्या यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान, त्यांच्या पुतण्याने हॉटेलमध्ये आलेल्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मारहाण करणाऱ्यांपैकी दोघांनी त्यांनी ओळखले. दरम्यान, साहित्या यांनी पोलीसांना दिलेल्या जबाबावरुन संशयित चार जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




















