
जळगाव मिरर | २८ नोव्हेंबर २०२५
शहरालगत असलेल्या सावखेडा बु. शिवारातील शाळा टार्गेट करत चोरट्यांनी चार शाळांमध्ये एकाच रात्री डल्ला मारला. याठिकाणाहून चोरट्यांनी विद्यार्थ्यांनी भरलेल्या शैक्षणिक फीसह शिष्यवृत्तीचे पैसे असा एकूण १ लाख ९४ हजारांचा ऐवज चोरुन नेला, ही घटना दि. २५ च्या सायंकाळी ५ ते दि. २६ रोजी पहाटे ६ वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी शाळांमध्ये चोरी करतांनाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून चोरट्यांच्या टोळीमध्ये महिला देखील सहभागी असल्याचे दिसून आले. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील सावखेडा बु. शिवारात चार ते पाच शाळा असून याठिकणावरील संपुर्ण परिसर मोकाळा आहे. याठिकाणी असलेल्या वर्धमान सीचीएससी इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक आशिष चंद्रकांत अजमेरा (वय ५३, रा. हरेश्वर नगर) यांनी पोलिसात तक्रार दिली. यामध्ये त्यांनी दि. २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी या कक्षातील लोखंडी कपाटात विद्यार्थ्यांची फी आणि शिष्यवृत्ती परीक्षेची रक्कम अशी एकूण १ लाख ३५ हजार रुपयांची रोख रक्कम स्टिलच्या पेटीत ठेवलेली होती. शाळा सुटल्यानंतर प्रशासकीय कक्षाला लॉक लावून ते नेहमीप्रमाणे घरी निघून गेले. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या शाळेच्या ग्रीलच्या गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.२५ वाजता अजमेरा शाळेत पोहोचले, तेव्हा त्यांना मुख्य आणि दुसऱ्या ग्रिल गेटचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी सुरक्षा रक्षकांना विचारपूस केल्यानंतर थेट अॅडमिन रूममध्ये धाव घेतली. तिथे कपाटाचे आणि स्टिल पेटीचे कुलूप तोडून आतील संपूर्ण रोख रक्कम चोरीला गेल्याचे त्यांना दिसून आले. शाळेत चोरी झाल्याची माहिती अजमेरा यांनी तालुका पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीसांचे पथक शाळेत आल्यानंतर त्यांच्याकडून चौकशी केली जात होती. दरम्यान, पोलिसांना याच परिसरात असलेल्या जी. एस. रायसोनी पब्लिक स्कूल, विवेकानंद प्रतिष्ठान संचलित शानबाग विद्यालय व गुरुकुल किड्स या शाळांमध्येही मध्यरात्रीच्या सुमारास चोरी झाल्याचे समजले. याचोरी प्रकरणी अजमेरा यांच्या फिर्यादीवरुन जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




















