
जळगाव मिरर । २८ नोव्हेंबर २०२५
भुसावळ नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहरात विशेष पेट्रोलिंग करणाऱ्या भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने बुधवारी (२६ नोव्हेंबर २०२५) रात्री ११.१० वाजता मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यातील आंतरराज्य दरोडेखोर टोळक्याला पकडले. पोलिसांनी तीन संशयितांना घटनास्थळीच ताब्यात घेतले, तर उर्वरित पाच साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
सविस्तर वृत्त असे कि, पकडलेले आरोपीमध्ये शुभम दुर्गाप्रसाद ओनकर (वय २४, रा. पोखरणी, ता. खिडकिया, जि. हरदा म.प्र.), मृत्युंजय उर्फ भोला संत्येंद्र कवीशेखर (वय ४३, रा. बंगाली कॉलनी, हरदा म.प्र.), राजू उर्फ शिवकुमार भगवानदास माणिक (वय १९, रा. मंगल बाजार, खिडकिया, हरदा म.प्र.) हे तिघे काळा हनुमान मंदिरासमोरील भाजी मार्केटजवळील आदर्श पॅकेजिंग दुकानाच्या मागे लपून बसले होते. पोलिसांना पाहताच ते पळू लागले, परंतु पोलिसांनी पाठलाग करून घटनास्थळीच तिघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी दरोडेखोरांकडून गावठी पिस्तुल (१५,००० रुपये) आणि त्यातील दोन जिवंत काडतुसे (प्रत्येकी २,००० रुपये) १२ इंच लांबीचा चॉपर (पाते ८ इंच), मिरची स्प्रे, २० फूट लांबीचा दोर, तीन बिना नंबर मोटारसायकली (बजाज पल्सर काळी व राखाडी, अपाची झ लाल; एकूण किंमत अंदाजे १.५० लाख रुपये) दोन मोबाईल फोन जप्त केले. आरोपींनी चौकशीत कबुली दिली की, भुसावळमधील बंटी परशुराम पथरोड, शिव पथरोड, अभिषेक जवाहरलाल गौर आणि तेजस चंद्रकांत टकले यांनी त्यांना भुसावळ शहरातील सराफ बाजारातील दुकाने आणि श्रीमंतांच्या बंगल्यांवर दरोडा टाकण्यासाठी पाचारण केले होते. स्थानिक आरोपींनी टार्गेट दाखवले होते आणि बुधवारी रात्री दरोडा टाकण्याच्या तयारीत हे तिघे लपले होते.
पळालेले साथीदारामध्ये मयूर ओमप्रकाश टाक (रा. पोखरणी, हरदा), आशिष चोटी, विरेंद्र कडोले उर्फ भय्यू येडा, हनी ठाकुर, एक अज्ञात आरोपी याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात पो.हे.कॉ. विजय नेरकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पळून गेलेल्या आरोपी व स्थानिक साथीदारांचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंगेश जाधव व पथकाने यशस्वी केली




















