जळगाव मिरर । ३ डिसेंबर २०२५
लोकशाहीचा उत्सव सर्वांसाठी सुखदायी व्हावा म्हणून भुसावळ येथे मतदारांना मदत करताना स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार मुरलीधर धनगर यांनी दाखवलेली कर्तव्यनिष्ठा आणि मानवतेची भावना सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मतदानासाठी आलेल्या एका वृद्ध, चालण्यास अक्षम महिलेची अवस्था पाहताच धनगर यांनी तिला आपल्या आईसमान मानत तत्काळ मदतीचा हात पुढे केला.
आरोग्य ठीक नसल्याने आणि चालता न आल्याने वृद्धेला मतदान केंद्रापर्यंत पोहोचणे कठीण झाले होते. परिस्थिती ओळखून अंमलदार धनगर यांनी त्यांना आपल्या हातावर आधार देत शांतपणे उचलून मतदान केंद्राच्या आत नेले. त्यांनी तिला रांगेत उभे न ठेवता थेट बूथपर्यंत नेऊन मतदानाचा हक्क बजावता येईल याची पूर्ण काळजी घेतली.
मतदान केल्यानंतरही त्यांनी त्या मातेला सुरक्षितरित्या बाहेर आणून तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. त्यांच्या या कृत्यामुळे मतदान केंद्रात उपस्थित मतदारांनीही समाधान व्यक्त केले. लोकशाही प्रक्रिया सर्वांसाठी सुलभ व्हावी, तसेच कोणताही मतदार वंचित राहू नये यासाठी केलेली ही सेवा पोलिस दलातील संवेदनशीलता आणि जनतेप्रती असलेल्या बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरली. अंमलदार मुरलीधर धनगर यांच्या या कार्याचे सामाजिक स्तरावर कौतुक करण्यात येत आहे.





















